महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक इतिहासात रयत शिक्षण संस्थेचे स्थान अनन्यसाधारण आणि प्रेरणादायी आहे. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी काले येथे संस्थेची स्थापना केली. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि वंचित समाज घटकांतील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी, हा त्यामागील मुख्य उद्देश होता, "कमवा आणि शिका" (Earn and Learn) ही संकल्पना प्रत्यक्षात आणून शिक्षण सर्वसामान्यांच्या दारी नेण्याचे महान कार्य कर्मवीरांनी केले.
सुरुवातीच्या काळात आर्थिक साधनांची कमतरता, सामाजिक विरोध आणि जातीय अडथळे असूनही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जिद्दीने कार्य चालू ठेवले. त्यांनी विद्यार्थ्यांना श्रमाच्या माध्यमातून शिक्षणाची संधी दिली. विद्यार्थी शेतात, वसतिगृहात किंवा इतर कामांमध्ये श्रम करून स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवत असत. या प्रयोगामुळे शिक्षणात स्वावलंबन, श्रमसंस्कार आणि सामाजिक समता यांचा संगम घडून आला.
रयत शिक्षण संस्थेने ग्रामीण समाजजीवनात शिक्षणाचा व्यापक प्रसार केला. प्राथमिक शिक्षणापासून महाविद्यालयांपर्यंत विविध स्तरांवरील शैक्षणिक शाखा उभारून शिक्षणाचा विस्तार केला. विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र शाळा व वसतिगृहे सुरू करून स्त्रीशिक्षणाला चालना दिली. सामाजिक समतेचा पुरस्कार करताना सर्व जातिधर्मांतील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याची परंपरा संस्थेने जोपासली. संस्थेचे सकारात्मक शैक्षणिक प्रयोग अनेक दृष्टीने उल्लेखनीय आहे. “कमवा आणि शिका” या योजनेस आज आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली आहे. याशिवाय, ग्रामीण भागात निवासी शाळा, शेतकरी व कामगारांच्या मुलांसाठी विशेष वसतिगृहे, आणि विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठेची भावना निर्माण करणारे उपक्रम राबविले गेले. शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षक प्रशिक्षण, अभ्यासक्रमातील नावीन्य, तसेच सामाजिक मूल्यांवर आधारित शिक्षण यावर संस्थेने भर दिला आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात संस्थेने उच्च शिक्षण क्षेत्रातही पाऊल टाकले. कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, कृषी, कायदा, व्यवस्थापन, शिक्षण अशा विविध शाखांमध्ये महाविद्यालये सुरू करून ग्रामीण युवकांना उच्च शिक्षणाची दारे खुली केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संशोधनाला प्रोत्साहन, तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे सुरू करून विद्यार्थ्यांना व्यापक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. उच्च शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील मूल्यांकनामध्ये अनेक महाविद्यालयांना सर्वोत्कृष्ट मानांकने प्राप्त झाली आहेत. याशिवाय संस्थेने कर्मवीरांच्याच नावाने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, साताराची स्थापना करून विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे नवे दालन खुले केले आहे. रयत शिक्षण संस्था ही केवळ शैक्षणिक संस्था नसून एक सामाजिक चळवळ आहे. तिने ग्रामीण महाराष्ट्रात शिक्षणाचा दीप प्रज्वलित करून लाखो विद्यार्थ्यांचे जीवन उजळवले आहे. समता, स्वावलंबन, स्वाभिमान आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित संस्थेचे कार्य प्रेरणादायी आहे. शतकाहून अधिक काळाच्या या प्रवासात संस्थेने शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणण्याचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले आहे.
"शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एकमेव साधन आहे हे जाणून पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काले, ता. कराड येथे भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेमध्ये रयत शिक्षण संस्था स्थापन करण्याची घोषणा केली आणि ४ ऑक्टोबर १९१९ मध्ये संस्थेची स्थापना झाली."
१९२४ मध्ये संस्थेचे सातारा येथे स्थलांतर करण्यात आले. एक हरिजन विद्यार्थी घेऊन अण्णांनी वसतिगृह सुरू केले. पुढे रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षण कार्यास त्यांनी वाहून घेतले. स्थानिक लोकांच्या गरजेतून आणि रयत शिक्षण संस्थेच्या सहकार्यातून कर्मवीरांच्या प्रेरणेने शिक्षण प्रसाराचे कार्य संख्यात्मकदृष्ट्या आणि गुणात्मकदृष्ट्या ही गेली १०६ वर्षे सातत्याने वृद्धिंगत होत आले आहे.
१९१९ साली लावलेल्या ज्ञानरोपट्याचे आज एका प्रचंड वटवृक्षात रूपांतर झाले आहे. महाराष्ट्राच्या १५ आणि कर्नाटक राज्यातील ०१ अशा १६ जिल्ह्यांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणापासून विद्यापीठीय शिक्षणापर्यंत प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय, वसतिगृहे, आश्रमशाळा अशा एकूण ७४४ शाखांमध्ये ४,१८,९११ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर ११७५९ सेवक शिक्षण प्रसाराचे पवित्र कार्य करीत आहेत. रयत शिक्षण संस्था ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात शिक्षणातून समाज परिवर्तनाचे ऐतिहासिक काम करीत आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या बहुजन समाजाच्या अभ्युदयासाठी एका सेवावृत्ती आणि मानवतावादी दृष्टिकोनातून काम करणारी रयत शिक्षण संस्था भारतातील एक आदर्श आणि अग्रगण्य शिक्षण संस्था आहे. वटवृक्षासारखा विस्तार असणाऱ्या या संस्थेने औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणासंदर्भात दिलेले योगदान अनन्यसाधारण असेच आहे.
आधुनिक शिक्षण भगीरथ असा ज्यांचा सार्थ गौरव केला जातो. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील हे महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, संत गाडगे महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर परंपरेतील एक कृतिशील समाजसुधारक, निर्भिड सत्यशोधक व शिक्षणतज्ञ्ज होते. आपल्या शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी समाजातील गोरगरीब, वंचित, उपेक्षित, अज्ञानी समाज बांधवांसाठी ज्ञानाच्या नव्या प्रकाश वाटा निर्माण केल्या. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची सर्वात महत्त्वाचे दोन वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी समाजातील सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एकाच वसतिगृहाची स्थापना करून खऱ्या अर्थाने समताधिष्ठित समाज व्यवस्थेचा कृतीशील पाया घातला.
अधिक माहिती →
रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा जन्म ७ जून १८९४ रोजी वारणा नदीच्याकाठी कुंभोज जि. कोल्हापूर या ठिकाणी झाला. बालपणापासूनच त्यांना ‘अदाक्का’ या नावाने ओळखले जात होते. अतिशय चंचल आणि मनमिळाव स्वभावाच्या असलेल्या अदाक्का तशाच त्या धार्मिक वृत्तीच्याही होत्या. १९१२ मध्ये भाऊराव पाटील यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. विवाहापूर्वी भाऊरावांचे कुटुंब अदाक्का यांना ओळखत होते. त्यामुळे त्यांना कधीही एकटे वाटले नाही. सासू-सासरे, नणंद, भावजय यांचा सुद्धा त्या नितांत आदर करीत. त्यांच्या उक्ती आणि कृतीतून सतत एक संस्कृती प्रतिबिंबित होत होती. त्या सतत कामात व्यघ्र असत तथापि कधीही कोणत्याही प्रकारची कामाबाबतची तक्रार करीत नसत.
सातारारोड जवळ नांदगिरी येथे भाऊराव पाटील भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्तीचे पूजन करण्यासाठी गेले होते. गुहेतून जात असताना त्यांच्याजवळ असलेल्या रायफलीतून चुकून बटन दाबल्याने जवळच असलेल्या आग्या मोहाच्या मधमाशांच्या पोळ्यावर उडाले. पोळ्यातील हजारो मधमाशा कर्मवीरांच्या अंगाला चावल्या. कर्मवीर बेशुद्ध पडले. सौ. लक्ष्मी वहिनी प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडे गेल्या आणि म्हणाल्या तुम्ही माझे भाऊ आहात. माझे सौभाग्य राखण्याचे काम मी तुमच्यावर सोपवते. प्रबोधनकार ठाकरे यांनी पळापळ करून सातारावरून डॉक्टर आणले. डॉक्टरांनी कर्मवीरांच्या शरीरातून हजारो काटे काढले. दुसऱ्या दिवशी भाऊरावांना बरे वाटले. ते शुद्धीवर आले. सौ.लक्ष्मीवहिनी म्हणाल्या, तुम्ही माझे सौभाग्य वाचवले. मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन. यावर प्रबोधनकार म्हणाले, वहिनी नियती या माणसाकडून पुढे काहीतरी अलौकिक कार्य करणार आहे म्हणूनच नियतीने भाऊरावांना वाचवले आहे.
अधिक माहिती →