
रयत माऊली
प्रेरणास्थान
रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा जन्म ७ जून १८९४ रोजी वारणा नदीच्याकाठी कुंभोज जि. कोल्हापूर या ठिकाणी झाला. बालपणापासूनच त्यांना 'अदाक्का' या नावाने ओळखले जात होते. अतिशय चंचल आणि मनमिळाव स्वभावाच्या असलेल्या अदाक्का तशाच त्या धार्मिक वृत्तीच्याही होत्या.
१९१२ मध्ये भाऊराव पाटील यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. विवाहापूर्वी भाऊरावांचे कुटुंब अदाक्का यांना ओळखत होते. त्यामुळे त्यांना कधीही एकटे वाटले नाही. सासू-सासरे, नणंद, भावजय यांचा सुद्धा त्या नितांत आदर करीत. त्यांच्या उक्ती आणि कृतीतून सतत एक संस्कृती प्रतिबिंबित होत होती.
सातारारोड जवळ नांदगिरी येथे भाऊराव पाटील भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्तीचे पूजन करण्यासाठी गेले होते. गुहेतून जात असताना आग्या मोहाच्या मधमाशांच्या पोळ्यावर गोळी उडाली. हजारो मधमाशा कर्मवीरांच्या अंगाला चावल्या व ते बेशुद्ध पडले. सौ. लक्ष्मी वहिनी प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडे गेल्या आणि म्हणाल्या, "माझे सौभाग्य राखण्याचे काम मी तुमच्यावर सोपवते." त्यांनी सातारावरून डॉक्टर आणले; भाऊराव वाचले.
भाऊरावांच्या शैक्षणिक कार्यात वहिनींनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते. कोणी विचारले तुम्हाला किती मुले आहेत, त्यावर त्या उत्तर देत की, "वसतिगृहातील सर्व मुले माझीच आहेत." सर्व जाती-धर्माच्या मुलांना त्या स्वतःचीच मुले मानत.
आपल्या माहेरहून मिळालेले शेकडो तोळे सुवर्णअलंकार या वसतिगृहातील मुलांच्या भोजनासाठी आनंदाने देऊन टाकले. १९२८ मध्ये मकर संक्रांतीच्या सणाला दुकानदार उधारीवर किराणा द्यायला तयार नसताना त्यांनी क्षणाचाही विचार न करता स्वतःचे मंगळसूत्र काढून दिले आणि सांगितले, "माझा पती एवढा कर्तबगार असताना मला या मंगळसूत्राची काय गरज ?"
सौ. लक्ष्मीबाई उर्फ वहिनी यांनी त्यागपूर्वक व मातेच्या ममतेने वसतिगृहाच्या छोट्या रोपट्याचा रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आज प्रचंड वटवृक्ष निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांना आईचे प्रेम दिले, सामाजिक दृष्टी दिली, समता, बंधुता, करुणा या गुणांची जोपासना केली.
३० मार्च १९३० रोजी अखेरच्या क्षणी त्यांनी भाऊरावांना सांगितले — "वसतिगृहातील अस्पृश्य मुलांसह सर्वांनी मला खांदा द्यावा" आणि "मुलांचा पाडव्याचा सण चुकवू नका." इतके बोलून त्यांनी प्राण सोडला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याला रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई यांच्या निस्सीम त्यागाची साथ मिळाली नसती तर रयत शिक्षण संस्था एवढ्या सक्षमपणे महाराष्ट्रातील बहुजन समाजासाठी शिक्षण प्रसार करू शकली असती का? — हा खूप अंतर्मुख करणारा प्रश्न आहे.