Rayat Shikshan Sanstha Logo

रयत शिक्षण संस्था

"स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद" - कर्मवीर

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील

← मागे
Dr. Karmaveer Bhaurao Patil

संस्थापक

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या बहुजन समाजाच्या अभ्युदयासाठी एका सेवावृत्ती आणि मानवतावादी दृष्टिकोनातून काम करणारी रयत शिक्षण संस्था भारतातील एक आदर्श आणि अग्रगण्य शिक्षण संस्था आहे. वटवृक्षासारखा विस्तार असणाऱ्या या संस्थेने औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणासंदर्भात दिलेले योगदान अनन्यसाधारण असेच आहे.

आधुनिक शिक्षण भगीरथ असा ज्यांचा सार्थ गौरव केला जातो, त्या पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील हे महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, संत गाडगे महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर परंपरेतील एक कृतिशील समाजसुधारक, निर्भिड सत्यशोधक व शिक्षणतज्ञ आहेत.

आपल्या शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी समाजातील गोरगरीब, वंचित, उपेक्षित, अज्ञानी समाज बांधवांसाठी ज्ञानाच्या नव्या प्रकाश वाटा निर्माण केल्या. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची सर्वात महत्त्वाचे दोन वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी समाजातील सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एकाच वसतिगृहाची स्थापना करून खऱ्या अर्थाने समताधिष्ठित समाज व्यवस्थेचा कृतीशील पाया घातला. तर केवळ आर्थिक परिस्थिती नाही म्हणून समाजातील कोणतेही मुलाचा शिक्षणाचा मूलभूत हक्क नाकारला जाऊ नये यासाठी कमवा आणि शिका ही योजना कार्यान्वित करून बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांनी ज्ञानाचे कारण खुले केले. जात, धर्म, पंथ, भेद तसेच आर्थिक आणि सामाजिक विषमता यांना मूठमाती देऊन समता, सहजीवन आणि सहभावना यांचे संस्कार घडवून आणले.

भारतासारख्या गरीब देशाला सर्वांगीण आणि सार्वत्रिक शिक्षण द्यायचे असेल तर "स्वावलंबन आणि समप्रतिष्ठा हे दोन मूलमंत्र समोर ठेवले पाहिजे" याची जाणीव कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून करून दिली. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात आज बहुजन समाजातील जे कर्तृत्वान पिढी दिसते आहे त्याचे श्रेय कर्मवीरांनाच द्यावे लागेल.

आज महाराष्ट्र ज्ञानाच्या क्षेत्रात संपूर्ण देशात अग्रेसर दिसून येतो आहे. त्याला कर्मवीरांची शैक्षणिक चळवळ कारणीभूत आहे असे म्हटले तर ते अनुचित ठरणार नाही. पारंपारिक शिक्षणाबरोबरच आधुनिक काळाला उपयुक्त असणारे शिक्षण देणे हा रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा मूळ उद्देश आहे. हेच तत्व समोर ठेवून कर्मवीरांनी काळानुरूप आपल्या शैक्षणिक धोरणात सकारात्मक बदल केले. संस्थेच्या संख्यात्मक विस्ताराबरोबरच गुणात्मक विस्ताराला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांनी घालून दिलेल्या विचारांवर आजही रयत शिक्षण संस्था अत्यंत सक्षमपणे वाटचाल करीत आहे.

संगणक शिक्षण, रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी, इंग्रजी माध्यमांच्या शाळा, संशोधन आणि विकास धोरण, माजी विद्यार्थी संघटना, इंटरॅक्टिव्ह पॅनेल यासारख्या अत्याधुनिक शैक्षणिक साधनांचा वापर करून नवा महाराष्ट्र घडवण्याचे काम रयत शिक्षण संस्थेने केले आहे.