Rayat Shikshan Sanstha Logo

रयत शिक्षण संस्था

"स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद" - कर्मवीर

उपक्रम

सर्व उपक्रम

रयत शिक्षण संस्था, सातारा

रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी

देशातील तरुण तरुणींना स्वतःचे करियर विकसित करण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगार हे दोन महत्त्वाचे मार्ग उपलब्ध आहेत. ज्या तरुणांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यामध्ये अधिक रुची आहे असे तरुण उद्योजकतेच्या मार्गाने आपले करिअर उभे करतात. मात्र ज्यांना उद्योजकतेचा मार्ग अवलंबता येणे शक्य नाही. अशा विद्यार्थ्यांना आपले करिअर करण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा एक उत्तम मार्ग आहे.

सद्या देशामध्ये UPSC, MPSC, IBPS, RRB, SSC, संरक्षण सेवा, पोलीस भरती इत्यादी केंद्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांद्वारे उच्च स्तरीय आणि कनिष्ठ स्तरीय पदांच्या संधी उपलब्ध आहेत. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षांबाबत सविस्तर माहिती, अद्ययावत अभ्यास साहित्य, तांत्रिक व शैक्षणिक मार्गदर्शन तसेच योग्य दिशादर्शनाचा अभाव जाणवतो. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांची स्थापना करणे अत्यावश्यक आहे. रयत शिक्षण संस्थेच्या काही निवडक महाविद्यालयात एमपीएससी, यूपीएससी तसेच आयबीपीएस द्वारे घेतल्या जाणाऱ्या भरती परीक्षांची पूर्वतयारी करून घेण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आली आहे. मात्र इतर महाविद्यालयात अशी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात आलेली नाहीत. परिणामी या महाविद्यालयातील युवक युवतींना या संधी पासून वंचित राहावे लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करून रयत शिक्षण संस्थेच्या सर्व महाविद्यालयात रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येत आहेत.

रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीमुळे ग्रामीण युवक-युवतींमध्ये स्पर्धात्मक परीक्षांविषयी जागरूकता निर्माण होते, करिअरच्या विविध संधी ओळखण्याची क्षमता विकसित होते आणि त्यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीस चालना मिळते. त्यामुळे शिक्षण संस्थांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून प्रभावी व सुसंगत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रणाली उभी केल्यास, ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्याचे नवे मार्ग खुले होतील.

रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीची उद्दिष्टे:

रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत :

  1. परिसरातील युवक युवतींना केंद्रीय, राज्यस्तरीय तसेच स्थानिक पातळीवर घेतल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, पात्रता, अभ्यासक्रम आणि व त्याअंतर्गत होणाऱ्या भरती प्रक्रीये बाबतची माहिती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करणे.
  2. गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन व प्रशिक्षण प्रदान करणे. विषयानुरूप तज्ञांचे व्याख्यान, वर्ग, सराव परीक्षा, प्रश्नपत्रिका विश्लेषण, वेळ व्यवस्थापन आणि अध्ययन कौशल्ये विकसित करणे.
  3. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी सुलभ, सोयीस्कर आणि किफायतशीर अशी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्यवस्था निर्माण करणे.
  4. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण सुरु असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु करण्यास प्रवृत्त करणे, स्वतःचे करिअर उद्दिष्ट निश्चित करण्यास विद्यार्थी सक्षम करणे.
  5. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रंथालय, अभ्यासिका, संगणक कक्ष, डिजिटल लर्निंग संसाधने, ऑनलाइन सराव परीक्षा उपलब्ध करून देणे.
  6. महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थ्यांना व परिसरातील इच्छुक युवक युवतींना विविध प्रकारच्या भरती परीक्षेची माहिती देणे व खात्रीशीर मार्गदर्शन उपलब्ध करून देणे.
  7. विविध विभागांच्या भरती जाहीराती, अंतिम तारखा, परीक्षा बदल, निकाल यांची अद्ययावत माहिती उपलब्ध करणे.
  8. स्पर्धा परीक्षेच्या तयारी बरोबरच विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास व मुलाखत प्रशिक्षण देण्यासाठी विशेष व्यवस्था करणे, त्याकरिता तज्ञ मार्गदर्शक उपलब्ध करून देणे.
  9. स्पर्धा परीक्षेतील यशासाठी सातत्यपूर्ण मूल्यांकन पद्धती विकसित करणे, त्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन मॉक टेस्टची व्यवस्था करणे. मूल्यांकनानंतर आवश्यक असणारे मार्गदर्शन करणे.
  10. नामांकित खाजगी स्पर्धा परीक्षा अकॅडमींची मदत घेऊन विद्यार्थ्यांना तज्ञांचे मार्गदर्शन व अभ्यास साहित्य उपलब्ध करून देणे.
  11. स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी करून घेण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचा लाभ संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन मार्गदर्शनाची व्यवस्था निर्माण करणे.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रकार

संस्थेच्या महाविद्यालयात पुढील प्रकारचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात यावीत.

१. एकात्मिक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (Integrated Competitive Examination Guidance Centre-ICEGC):

ज्या महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान अशा विविध विद्याशाखा कार्यरत आहेत. अशा वरिष्ठ महाविद्यालयात एकात्मिक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (Integrated Competitive Examination Guidance Centre-ICEGC) सुरू करण्यात यावे. या मार्गदर्शन केंद्राद्वारे MPSC, राज्यसेवा, सरळसेवा भरती, UPSC, IBPS, SSC, RRB, NTA व इतर स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्याची व्यवस्था करावी.

२. बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (Banking Competitive Examination Guidance Centre-BCEGC):

ज्या महाविद्यालयात वाणिज्य विद्याशाखा कार्यरत आहे. अशा महाविद्यालयात बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील विविध प्रकारच्या भरती परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात यावे. अशा केंद्राद्वारे IBPS, SBI, RBI, RRB, LIC, GIC, सहकारी बँकांमधील भरती परीक्षातसेच शासनाद्वारे घेतल्या जाणाऱ्या अनुषंगिक स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यात यावी.

३. SSC, RRB मिलिटरी व पोलीस भरती मार्गदर्शन केंद्र (SSC, RRB, Military and Police Recruitment Guidance Centre -SRMP):

वरील विविध भरती परीक्षांबरोबरच स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे रिक्रुटमेंट, बोर्ड पोलीस व मिलिटरी भरती परीक्षा इत्यादींच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात नोकर भरती होत असते. अशा भरती परीक्षांची पूर्वतयारी करून घेण्यासाठी SSC, RRB, मिलिटरी व पोलीस भरती मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात यावे. यामध्ये SSC CGL (Combined Graduate Level), SSC CHSL (10+2 Level), Multi-Tasking Staff (MTS), Constable (GD), Junior Engineer (Civil / Electrical / Mechanical), RRB NTPC (Non-Technical Popular Categories), RRB Group D, RRB Assistant Loco Pilot (ALP) & Technician, RRB Ministerial & Isolated Staff, इत्यादी भरती परीक्षा तसेच केंद्रीय आणि महराष्ट्र पोलीस भरती आणि मिलिटरी भरती परीक्षा व शारीरिक क्षमता चाचणी परीक्षा इत्यादीची पूर्वतयारी करून घेण्यात यावी.